सिल्लोड (प्रतिनिधी) : सिल्लोड येथे दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशी निमित्ताने शहरात टाळ मृदंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात भव्य दिंडी काढण्यात आली होती. या दिंडी मध्ये माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिंडीचे स्वागत करून वारकरी बांधवांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या.
आमदार अब्दुल सत्तार यांनी पालखीतील विठ्ठल रुखमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. तसेच त्यांनी दिंडी प्रमुख ह.भ.प. मनोज महाराज भाग्यवंत यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देत राज्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन शेतकरी - कष्टकरी सुखी होऊ दे, समस्त वारकरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच पांडुरंगाने आमच्यावर कृपादृष्टी ठेवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करावे, सर्वांना निरोगी उदंड आयुष्य लाभो अशा शब्दांत त्यांनी विठुराया चरणी आराधना केली.
यावेळी वारकरी बांधवांच्या वतीने ह. भ. प. मनोज महाराज भाग्यवंत यांच्याहस्ते आमदार अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. केलेल्या सत्काराबद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी आभार मानले. दरम्यान तालुका शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने शहरातील प्रियदर्शनी चौकात भाविकांसाठी फरळाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी फराळ वाटपात सहभागी होत भाविकांना फराळ वाटप केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, न.प.तील शिवसेना गटनेने सुधाकर पाटील, कृउबा समितीचे संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, सतिश ताठे, नगरसेवक विशाल जाधव, सिद्धेश्वर आहेर, अशोक बन्सोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख मनोज झंवर, प्रशांत क्षीरसागर, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र (बापू) पाटील, संचालक शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे, युवासेनेचे शिवा टोम्पे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, प्रवीण कटारिया, अक्षय मगर, गौरव सहारे, दत्ता पा. शेजुळ, जगन्नाथ कुदळ, राजू सुरडकर, विजय खाजेकर, पांडुरंग डवणे, संजय प्रशाद आदिंची उपस्थिती होती.













